To provide health services to financially poor, weak patients through charitable hospitals :-
धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये राज्यातील एकुण 467 धर्मादाय रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी धर्मादाय योजनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार रुग्णालयाकडून त्यांच्या एकूण खाटांच्या प्रत्येकी 10 टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निर्धन घटकासाठी 10 टक्के व दुर्बल घटकासाठी 10 टक्के राखीव खाटांची परिगणना करतेवेळी त्या रुग्णालयाच्या प्रत्येक श्रेणीतील खोलीनिहाय 10 टक्के खाटा सामान्य खोली व विशेष खोली याप्रमाणे करण्यात येणार आहे.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्याकरिता मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लक्ष 80 हजार रूपये इतकी तर दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार 50 टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लक्ष 60 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडी च्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी, याबाबतचे स्पष्ट निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे. अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी आकारलेल्या दरानेच आकारणे योजनेमध्ये नमूद आहे.
औषधे व उपयोगात आणलेल्या वस्तु (कन्ज्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू (इंम्प्लांट्स) यांच्या दराची आकारणी मुळ खरेदी किंमतीच्या दराने देयकात आकारण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याकरिता अथवा त्या सारख्या अन्य संवेदनशील आजारांवर उपचार करण्याकरिता दाखल असलेल्या रुग्णाला विशेष खोली उपलब्ध करुन देणे, त्याकरिता कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारणे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही, याबाबतच्या सुचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमूद आहेत.
धर्मादाय योजनेनुसार रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या कल्पनेतून साकारण्यात येत असलेले मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असुन लवकरच त्याचे डिजिटल अनावरण लवकरच होणार आहे.
या मोबाईल अप्लिकेशवर धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रत, योजना प्रभावी पणे राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीची प्रत मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी, रुग्णालयांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांची नावे, रुग्णालय निहाय राखीव असलेल्या व त्यापैकी उपलब्ध असलेल्या खाटांची वेळोवेळी अद्ययावत (Update) असलेली संख्या अप्लिकेशच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
धर्मादाय रुग्णालय अथवा इतर कोणत्याही संदर्भात तक्रार करावयाची असल्यास मोबाईल अप्लिकेशनवर तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवुन देण्यास मदत करण्याची महत्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्यात येत आहे.
धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेमध्ये नमूद केल्यानुसार रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे. ही तपासणी समिती वेळोवेळी धर्मादाय योजनेमध्ये व आदर्श कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमूद केलेल्या नियमानुसार रुग्णालयांकडून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्यात येत असल्याबाबतची रूग्णालयांची पडताळणी करणार आहे. रुग्णालयांकडून दर्जेदार रूग्णसेवा पुरविण्यात येत नसल्यास अशा रूग्णालयांवर कठोर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव धर्मादाय व आरोग्य विभागास सादर करण्याचे अधिकार समितीस असणार आहेत.
निर्धन व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्यास दिरंगाई केल्यास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान केल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडून दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंतांना वैद्यकीय सेवा देण्यास धर्मादाय रुग्णालयांकडून अथवा कोणत्याही व्यक्तीकडून दिरंगाई करण्यात आल्यास संबंधितांवर दोन्ही सभागृहांचा हक्कभंग केल्याचे समजण्यात येऊन त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तरी धर्मादाय रुग्णालय योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शीपणे रुग्णांना प्राप्त व्हावी या हेतूने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कल्पनेतून या योजनेबाबतची आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.